https://www.chronicles360.com

Fundamentals of Botany : वनस्पती शास्त्राची प्राथमिक ओळख

Fundamentals of Botany : वनस्पती शास्त्राची प्राथमिक ओळख

वनस्पतीचे महत्त्व व उपयोग :

अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या प्रमुख गरजा आहेत. या तीनही प्रमुख गरजा बहुतेक करून वनस्पतीपासून बहुतांशी पूर्ण होतात. उदाहरणार्थ, अन्न ज्वारी, बाजरी, गहू, मका व भात फळे- आंबा, केळी, पेरू, इत्यादी वस्त्र कापूस; निवारा लाकूड. वनस्पतींपासून अनेक प्रकारची औषधे मिळतात. उदाहरणार्थ, सोनामुखी, सर्पगंधा, कोयनेल. क्रूड, दगडी कोळसा व लिनाइटसारखे जळण हे अनेक वर्षांपूर्वी जमिनीच्या खाली गाडले गेलेले वनस्पतींचे अवशेष आहेत. पुरातनकाळी अस्तित्वात असलेल्या सूक्ष्म वनस्पती व प्राणी यांचे खडकाच्या थरांतून तेलात रूपांतर होऊन पेट्रोलियम तयार होते.

वनस्पतीचे इतरही काही महत्त्वाचे उपयोग आहेत. झाडांची मुळे जमिनीत खोल जाऊन माती घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे जमिनीची धूप थांबते. जमिनीची पाणीधारणा क्षमता वाढते व पाणी जमिनीत जिरते. हेच पाणी पुढे झरे व विहिरीत झिरपते. जमिनीवर पानांचा थर साचून बाष्पीभवन रोखले जाते व ओलावा टिकण्यास मदत होते. गवतासारख्या वनस्पतींच्या प्रचंड तंतुमुळांमुळे व जमिनीला घट्ट धरून ठेवण्याच्या क्षमतेमुळे जलसंधारण व धूपप्रतिबंधक कार्यक्रमात त्यांना महत्त्व आले आहे. वनस्पती दिवसा श्वासोच्छ्वासात कार्बन डायऑक्साईड वायू वापरून प्राणवायू वातावरणात सोडतात. त्यामुळे इतर सजीवांना श्वासोच्छ्वास करणे शक्य होते. अशा प्रकारे हवा सतत शुद्ध राहते. आपण सहलीसाठी मनाली, उटी, महाबळेश्वरसारख्या ठिकाणी जातो. विश्रांतीसाठी काश्मीरला जातो. मानवाच्या सौंदर्यदृष्टीला व साहसाला वनस्पती आव्हान देतात. अनेक काव्ये व महाकाव्ये आजूबाजूच्या निसर्गाच्या सौंदर्यामुळे निर्माण झाली.

आहेत. अशा प्रकारे वनस्पतींचे पृथ्वीवरील मानव आणि प्राणी यांच्या संदर्भात अनन्यसाधारण महत्त्व व उपयोग आहेत. म्हणून वनस्पतीचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. वनस्पतीच्या स्थूल अभ्यासाला ‘वनस्पतिशास्त्र’ असे म्हणतात.

सजीव व निर्जीव आणि प्राणी व वनस्पती यांतील फरक

सजीव व निर्जीव यांच्यामध्ये पुढीलप्रमाणे महत्त्वाचे फरक दिसून येतात.

(1) सजीवांमध्ये स्वप्रेरणेने हालचाल व स्थलांतर दिसून येते. परंतु निर्जीवांत हे लक्षण दिसत नाही.

(2) सजीवांच्या अंगी चेतनाक्षमता म्हणजे पर्यावरणातील बदलास प्रतिसाद देण्याचे लक्षण असते. उदाहरणार्थ, पैसा ( वाणी) या प्राण्याला स्पर्श केल्यावर तो शरीराचे वेटोळे करतो. लाजाळू वनस्पतीला स्पर्श केल्यास पाने मिटतात.

(3) पेशीयुक्त शरीर असणे हे सजीवाचे लक्षण निर्जीवामध्ये नसते.

(4) सजीवांत घडणाऱ्या जीवनक्रियांचा निर्जीवांत अभाव असतो.

(5) प्रत्येक सजीवाला ऊर्जा मिळविण्यासाठी अन्नाची सतत गरज असते. निर्जीवात ऊर्जा व अन्नाची गरज नसते.

(6) सजीवांचा आकार आणि आकारमानात जी आंतरिक वाढ होते त्याला वृद्धी म्हणतात. निर्जीवात हे लक्षण दिसत नाही..

(7) सजीव स्वतःसारखाच दुसरा सजीव निर्माण करतो. या क्रियेला प्रजनन असे म्हणतात. निर्जीवात प्रजननक्षमता नसते.

(8) सजीवाच्या शरीरात चयापचय क्रियेत अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात. असे

टाकाऊ पदार्थ शरीराला घातक असल्याने ते शरीराबाहेर विशिष्ट अवयवाकडून बाहेर टाकले जातात. त्यास उत्सर्जन म्हणतात. निर्जीवात उत्सर्जन होत नाही. सजीवामध्ये प्राणी व वनस्पती यांचा समावेश होतो. त्यांमधील काही मूलभूत फरक पुढीलप्रमाणे आहेत.

(1) उच्च वनस्पतीमध्ये हरितद्रव्ये असतात. प्राण्यात ती नसतात.

(2) हरितलवके असणाऱ्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करून पोषण करतात. यालाच स्वयंपोषी म्हणतात. मात्र प्राणी परपोषी म्हणजे अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात.

(3) वनस्पती प्रत्यक्ष स्थलांतर करू शकत नाहीत; परंतु त्यांच्या अवयवयांची हालचाल होते. प्राणी हालचाल व संचार करतात.

(4) वनस्पतीची वाढ ठरावीक भागात होते व ती त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत चालू असते. प्राण्यांमध्ये वाढ ठरावीक भागात न होता ती सर्वत्र होते व अंतिम क्षणाच्या बरेच अगोदर वाढीची प्रक्रिया बंद होते.

(5) वनस्पतींमध्ये चेतनाक्षमता अस्पष्ट असते; मात्र प्राण्यांत ती सुस्पष्ट दिसते. 1.2.3 वनस्पतींची विभागणी सपुष्प, अपुष्प, एकदल व द्विदल वनस्पती

निसर्गात हजारो प्रकारच्या वनस्पती इतस्ततः विखुरलेल्या असतात. काही वनस्पती आकाराने व उंचीने विशाल असतात. काहींची उंची १०० मीटर पेक्षा जास्त असते; तर काही वनस्पती उंचीने फारच कमी म्हणजे फक्त काही सेंटिमीटर असतात. काही सूक्ष्म वनस्पती डोळयांनाही दिसत नाहीत.

वनस्पतीच्या शरीररचनेत विविधता असल्यामुळे सर्व वनस्पतींचा एकत्र अभ्यास करणे कठीण जाते. अभ्यासाकरिता वनस्पतींचे गट किंवा वर्ग पाडले तर सोयीचे होईल असे वाटल्यावरून वनस्पतींचे वर्गीकरण करण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत.

वनस्पतींचे स्थूल मानाने निरीक्षण केले तर फुले येणाऱ्या वनस्पती व फुले न येणाऱ्या वनस्पती असे प्रमुख दोन गट पडतात. फुले येणाऱ्या वनस्पतीस सपुष्प व फुले न येणाऱ्यांना अपुष्प वनस्पती म्हणतात.

(1) सपुष्प वनस्पती

सर्व सपुष्प वनस्पतींना बिया येतात. म्हणून त्यांस ‘बीजी’ वनस्पती म्हणतात. या बिया फळांच्या आत किंवा बाहेर असण्यावरून बीजी वनस्पतींचे दोन प्रकार पडतात.

आवृतबीजी वनस्पती : फळात बिया असलेल्या वनस्पतीस आवृतबीजी वनस्पती म्हणतात. उदाहरणार्थ, पावटा, वाटाणा, आंबा, गहू, इत्यादी.

अनावृतबीजी वनस्पती या वनस्पतींचे बियाणे फळाच्या बाहेर असते. म्हणून त्यांना नम्र बिया असलेल्या किंवा अनावृतबीजी वनस्पती म्हणतात. उदाहरणार्थ, सायकस, देवदार, इत्यादी.

आवृतबीजी वनस्पतीचे आणखी वर्गीकरण बीजपत्राच्या संख्येवरून पुढीलप्रमाणे करतात

एकदल वनस्पती:

या आवृतबीजी वनस्पतींमध्ये बियांत एक बीजपत्र असते. उदाहरणार्थ, मका, गहू, बाजरी, ज्वारी ऊस, केळी, इत्यादी

द्विदल वनस्पती :

या वनस्पतींच्या बियांत दोन बीजपत्रे असतात. उदाहरणार्थ, सूर्यफूल, घेवडा, वाटाणा, आंबा, इत्यादी.

(2) अपुष्प वनस्पती

या वर्गात अनेक प्रकारच्या वनस्पतींचा समावेश होतो. बुरशी, स्पायरोगायरा, शेवाळे, नेचे या सर्व अपुष्प वनस्पती आहेत. फुले न येणे हा प्रमुख गुण या सर्व वनस्पतींत असला तरी त्यांच्यामध्ये पुष्कळ फरक आढळतो. यामध्ये खालील पोटविभाग पडतात.

निरवयव वनस्पती किंवा थॅलोफायटा बुरशी, स्पायरोगायरा या वनस्पतींना अवयव नसतात. मूळ, खोड, पान, वगैरे अवयव त्यांच्या शरीरात दिसत नाहीत. यामध्येसुद्धा फरक असतो. बुरशीमध्ये हरितद्रव्य नसते; मात्र स्पायरोगायरात हरितद्रव्य असते. त्यामुळे अन्ननिर्मिती होते. बुरशी परोपजीवी असते. निरवयव वनस्पतींचे दोन

प्रकार पडतात.

अल्गी किंवा शैवाल या वनस्पती खाऱ्या किंवा गोड्या पाण्यात राहतात व स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. उदाहरणार्थ, क्लामिडोमोनास, स्पायरोगायरा, इत्यादी.

फंगस किंवा कवक (बुरशी) कार्बनी पदार्थ असेल अशा जागी या वनस्पती वाढतात. यांपैकी काही जीवोपजीवी असल्यामुळे त्या वनस्पती अगर प्राणी यांच्या शरीरांत आढळतात. यांतील काही वनस्पती जनावरांच्या मलमूत्रावर अथवा कुजलेल्या लाकडांवर ‘उगवतात. उदाहरणार्थ, भूछत्र, बुरशी, इत्यादी.

ब्रायोफायटा या वर्गात शेवाळ व लिव्हरवर्ट या दोन प्रकारच्या वनस्पतींचा समावेश होतो. शेवाळास खोड व पाने असतात. लिव्हरवर्टमध्ये फक्त पानासारखा भाग असतो, मात्र खोड नसते. या दोन्हींमध्ये मुळे नसतात. पण मूलकल्प असतात. अन्नशोषणाचे कार्य मूलकल्प करतात.

टेरिडोफायटा किंवा वाहिनीवंत वनस्पती नेचे वनस्पतीचा या वर्गात समावेश होतो. या वनस्पतीमध्ये मूळ, खोड व पाने असतात. मात्र फुले कधीही येत नाहीत. यामध्ये वाहिनीवंत ऊतिव्यूह असतो; म्हणून यास वाहिनीवंत वनस्पती म्हणतात.

सपुष्प वनस्पती जैविक विविधता व संधारण:

वनस्पतींमध्ये इतकी विविधता आहे की त्यांच्या विविधतेचा व कारणांचा अभ्यास करण्यास मानवी आयुष्य अपुरे पडेल. सपुष्प वनस्पतीचा पृथ्वीवर अवतीर्ण होण्याचा काल साधारण वरिष्ठ जीविक महायुगातला (म्हणजे सहा कोटी वर्षांपूर्वीचा) आहे. पृथ्वीच्या निम्म्या आयुष्यात तिच्यावर सजीव सृष्टी मुळीच नव्हती. त्यानंतर सजीव उत्पन्न झाले. पण ते अगदी सूक्ष्म होते. नंतर क्रमाक्रमाने अधिकाधिक श्रेष्ठ जातीचे जीव उत्पन्न झाले.

अतिप्राचीन वनस्पतींत विविधता कमी होती. पुष्पवंत वनस्पती एकमेकांपासून भिन्न होत्या, हे जरी खरे असले तरी मध्यमजीविक महायुगात (१२ कोटी वर्षांपूर्वी) त्या मुळीच नव्हत्या म्हणजे थोड्या पुष्पवंत वनस्पतींपासून काळाच्या ओघात बदल होऊन अनेक पुष्पवंत वनस्पती निर्माण झाल्या व वनस्पतींमध्ये विविधता निर्माण झाली. बऱ्याच विविध दिसणाऱ्या वनस्पतींचा मूलस्रोत मात्र एकच असणे शक्य आहे.

वनस्पतींमध्ये प्रचंड विविधता आहे. निलगिरीचे एका वाणाचे झाड १०० मीटर उंच वाढते तर दुसऱ्या वाणाचे झाड फक्त १ मीटर उंच वाढते. काही वृक्ष शेकडो, हजारो वर्षे जगतात तर काहींचे आयुष्य अल्प काळ असते. काही वृक्षांत खोडांचा घेर प्रचंड मोठा असतो, तर काहींत छोटा असतो. काही वनस्पती सपुष्प असतात, तर काही अपुष्प असतात. अशा प्रकारे पानांच्या प्रकारांत, आकारांत, फुलांच्या सुवासात, फळांच्या गोडीत, धान्याच्या प्रकारांत विविधता आहे. काही वनस्पती कीड व रोगास बळी पडतात, तर काहींत प्रतिकारक शक्ती असते. काही वनस्पती अत्यंत विषम हवामानात तग धरू शकतात. वनस्पतीच्या जननिक अंगातदेखील विविधता आढळते. तसेच वनस्पती पेशी, ऊती व ऊतिसमूह यांमध्ये विविधता आढळते.

या विविधतेचा उपयोग मानवाने सोईस्कररित्या करून घेतला आहे. पूर्वी अन्नधान्य देणाऱ्या वनस्पती फार कमी उत्पादन देत असत. त्या फार उंच वाढत. रोगप्रतिकारक शक्ती कमी असे व त्या खतांना प्रतिसाद देत नसत. सध्याच्या नवीन जाती जास्त उत्पन्न देतात व रोगप्रतिकारक असतात. गव्हाच्या व भाताच्या बुटक्या जाती निर्माण करून, अन्नधान्य उत्पादनात फार मोठी वाढ झाली व यापुढेही ती होत राहील. अशा प्रकारे वनस्पतींमधील विविधतेचा फायदा फार मोठा असल्याने त्यांचे रक्षण करणे फार महत्त्वाचे आहे. काळाच्या ओघात वनस्पतींचे काही प्रकार नष्ट होत आहेत. मात्र त्यांचे नष्ट होण्याचे प्रमाण फार कमी असते. सध्या आधुनिकीकरण व शहरीकरणामुळे मानवाचे जंगलसंपत्तीवर मोठ्या प्रमाणावर आक्रमण होत असून क्षणिक फायद्यासाठी या विविधतेचा मोठ्या प्रमाणावर नाश होत आहे. पर्यावरणाचा समतोल हा विषयदेखील चिंतेचा आणि जागतिक चर्चेचा बनला आहे. वनस्पती हा समतोल राखण्यात महत्त्वाचे कार्य करतात. दरवर्षी बऱ्याच वनस्पती दुर्मिळ होत चालल्या आहेत. योग्य वेळी याला आळा घातला नाही तर ही विविधता नाश पावेल व मानवाचे मोठे नुकसान होईल याची जाण आता संशोधक तसेच राजकीय नेत्यांनादेखील झाली आहे व या विविधतेचे संरक्षण करण्याचे प्रयत्न जागतिक पातळीवर सुरू करण्यात आले आहेत.

संधारणाचे प्रकार:

धार्मिक कारणामुळे होणारे संधारण काही वृक्ष, लतावेली, धान्ये अनेक धर्मांत पवित्र मानतात. उदाहरणार्थ, वड, पिंपळ, उंबर, इत्यादी. त्यामुळे त्यांची तोड होत नाही. प्राचीन मंदिरांभोवती असणाऱ्या देवदाराचे याच कारणाने रक्षण झाले आहे. अंधश्रद्धेमुळे अशी देवाची झाडे तोडली तर अरिष्ट येईल या भीतीपोटी जुनाट झाडांचे संरक्षण झाले आहे.

आदिवासी आदिवासींनी पिढ्यानपिढ्या वापरलेल्या धान्याच्या जाती जपून ठेवल्या आहेत व त्याच जाती आजही ते पेरतात. हे एक प्रकारचे फार महत्त्वाचे व मोलाचे संधारण आहे. औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतीची उत्तम माहिती व ओळख आदिवासींना असते. अशा वनस्पतींचे संधारणदेखील त्यांनी पूर्वीपासून केलेले आहे. आज संशोधक आदिवासी भागातल्या अशा वनस्पती गोळा करून त्यांचे आधुनिक पद्धतीने परत संधारण जगभर करत आहेत.

शास्त्रीय कारणामुळे होणारे संधारण आधुनिक शेतीमध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या कीडरोगास प्रतिकारक असलेल्या वाणाचे महत्त्व शास्त्रज्ञांनी अचूक ओळखले. विसाव्या शतकात वनस्पतिशास्त्राची मोठी प्रगती झाली. त्याचप्रमाणे वनस्पतीतील विविधतेचे महत्त्व समजल्याने संशोधकांनी सर्व जगभर शक्य तेवढ्या वनस्पतींच्या संधारणाचे प्रयत्न सुरू केले आहेत. देशात असणाऱ्या सर्व उपयोगी वनस्पतींच्या बियांचे

नमुने गोळा करून त्यांचे जतन करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा देशोदेशी उभारण्यात आल्या आहेत. जागतिक स्तरावरदेखील यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूदही करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणात ‘जिनबँका’ तयार करण्यात येत असून आधुनिक शीतगृहात बियाणे कित्येक वर्षे उगवणक्षम ठेवण्यात येत आहे. रोपपैदासकार वाणसंग्रह करून वाणाचे संधारण मोठ्या प्रमाणात करीत आहेत.

निसर्गत: होणारे संधारण काही वनस्पती स्वतःचे संधारण निसर्गात स्वतःच करतात. निसर्गाने काही वनस्पतींमध्ये फुले, फळे, बिया मोठ्या संख्येने येण्याची क्षमता निर्माण केलेली आहे व त्यामुळे या वनस्पतींचे निसर्गतः संधारण होते. मोठ्या वृक्षाखाली लहान वनस्पतीचे, वेलीचे निसर्गतःच संरक्षण होते. पुरामध्ये मोठाले वृक्ष वाहून जातात, मात्र लव्हाळयासारख्या वनस्पतीची मुळे खूप खोल जात असल्याने टिकून राहतात.

 

Fundamentals of Botany

वनस्पतीच्या मूळ, खोड व पानांची रचना

निसर्गात आपण विविध प्रकारच्या वनस्पती पाहतो. त्यांमध्ये आंबा, चिंच, वड, साग यांसारखे मोठे वृक्ष असतात, तसेच गुलाब, मोगरा, चमेली, नेचे अशा प्रकारची शोभिवंत, आकाराने लहान झाडेसुद्धा असतात. वनस्पतीचे मूळ, खोड, पान आणि फुले असे चार मुख्य भाग असतात व या चारही भागांत अनेक प्रकारची विविधता किंवा वेगळेपण आढळते.

(1) मूळ (रूट)

मूळरचना वनस्पतीच्या जमिनीखाली वाढणाऱ्या अक्षाला मूळ असे म्हणतात. बीजापासून प्रथम जे मूळ वाढते त्याला प्राथमिक मूळ म्हणतात. या प्राथमिक मुळाला अनेक शाखा फुटतात त्यांना दुय्यम मुळे म्हणतात. दुय्यम मुळांना पुढे अनेक बारीक उपमुळे फुटतात. या सर्व मुळांच्या समूहाला मूळसंस्था म्हणतात. मुळाच्या अग्रभागास मूलाग्र म्हणतात. यावर मूलावरण असते. मूलावरण एकपदरी किंवा अनेक पदरी असते व मूलाग्राचे ते रक्षण करते. मूलाग्रातील पेशींचे विभाजन होऊन नवीन पेशी तयार होतात. म्हणून या विभागास जनन विभाग किंवा संभवन विभाग म्हणतात. मूलावरणामागे लवनशील विभाग असतो व त्यामागे बऱ्याच अंतरापर्यंत मुळास सूक्ष्म केस असतात. त्यास मूलरोम म्हणतात. मूलरोम (केशमुळे) एकपेशीय असून ते पाणी व क्षाराचे शोषण करतात.

मुळांचे प्रकार : मुळांचे मुख्यतः दोन प्रकार आहेत 1) सोटमूळ (टॅप रूट), आणि 2 ) आगंतुक मूळ (अॅडव्हेटेशिअस रूट).

सोटमूळ (टॅप रूट) : वनस्पतीच्या बीजामध्ये अंकुर, बीजपत्रे व आदिमूळ असे अवयव असतात. आदिमूळ लांब व मोठे वाढून त्यापासून प्राथमिक मुळे तयार होतात. दुय्यम मुळे त्यांपेक्षा लहान असतात. या प्रकारच्या मुळांना खोटमूळ म्हणतात. बहुतेक द्विदल वनस्पतींची मुळे सोटमूळ प्रकारची असतात. उदाहरणार्थ, आंबा, चिंच, कापूस, इत्यादी. मुळांच्या टोकावर संरक्षणासाठी मूलाग्र किंवा टोपी असते. या मुळांवर लहानलहान मूलकेश असतात.

आगंतुक मूळ (अँडव्हेटेशिअस रूट) जी मुळे आदिमुळापासून न वाढता वनस्पतीच्या अन्य कोणत्याही भागापासून वाढतात, त्यांना आगंतुक मुळे असे म्हणतात. गवतामध्ये खोडाच्या पेरापासून असंख्य आगंतुक मुळे येतात व ती तंतुमय असतात.

अशा प्रकारची मुळे एकदल वनस्पतीमध्ये आढळतात. उदाहरणार्थ, गहू, ज्वारी, भात, बाजरी, मका, इत्यादी.

मुळांची कार्ये मुळाची मूलभूत आणि पूरक कार्ये आहेत. मूलभूत कार्यांत आधार व शोषण ही प्रमुख कार्ये आहेत. मुळे जमिनीला घट्ट पकडून ठेवतात आणि झाडाला आधार देतात. जमिनीतून क्षारयुक्त पाणी शोषून ते वरच्या भागांना पोहचविण्याचे काम मुळे करतात.

आधार व शोषण या मूलभूत कार्याशिवाय काही वनस्पतींची मुळे अन्य पूरक कार्य करतात. उदाहरणार्थ, 1 ) अन्नसंचय करणारी पूरक मुळे उदाहरणार्थ, गाजर, मुळा, बीट, इत्यादी 2 ) आधार मूळ : केतकी, वडाच्या पारंब्या, इत्यादी 3 ) हवाई मुळे उदाहरणार्थ, पोथॉस, खाण्याचे पान, इत्यादी.

(2) खोड (स्टेम)

बीजाच्या कोंबापासून जमिनीच्या वर सूर्यप्रकाशाकडे वाढणाऱ्या भागाला खोड असे म्हणतात.

खोडाची रचना : खोड हे फांद्या, फुले धारण करते. खोडाचे पर्वसंधी (नोड), कांडी (इंटरनोड) आणि मुकूल (बड) हे प्रमुख भाग आहेत. अग्रभागी कोंब आणि त्यामागे पाने अशी खोडाची रचना असते.

पर्वसंधी : खोडावर किंवा फांदीवर ज्या विशिष्ट ठिकाणी पाने फुटलेली असतात त्या फुगीर भागाला पर्वसंधी किंवा पेर म्हणतात.

कांडे : दोन लगतच्या पर्वसंधीमधील खोडाच्या भागाला कांडे म्हणतात. खोड अनेक कांड्यांनी बनलेले असते. गवत, बांबू, ज्वारी, ऊस यांच्या खोडावर पर्वसंधी व कांडे स्पष्ट दिसतात. खोड व पानांचा देठ यांमधील कोनास अक्षकोन म्हणतात.

मुकूल : खोडावरील अविकसित पानांच्या झुपक्यांना मुकूल असे म्हणतात. मुकुलाचे अग्रस्थ मुकूल व कक्षस्थ मुकूल असे दोन प्रकार आहेत. अग्रस्थ मुकूल खोडाच्या किंवा फांदीच्या टोकाला असतो; तर कक्षस्थ मुकूल खोड आणि पानाचा देठ यांमधील अक्षकोनात येते

खोडाचे प्रकार अंतरिक्ष आणि रूपांतरित असे खोडाचे दोन प्रकार आहेत. काही खोडे पूरक कार्य करतात व त्याप्रमाणे ती रूपांतरित होतात.

अंतरिक्ष खोडे सर्वसाधारणपणे खोडे जमिनीच्या वर वाढतात. ती भक्कम, बलवान व ताठ असतात. परंतु काही खोडे कमकुवत, रांगणारी, सरपटणारी असतात. त्यामुळे ती जमिनीवर सरपटतात किंवा आधाराच्या साह्याने वर चढतात.

रूपांतरित खोडे काही वनस्पतींची खोडे जमिनीखाली असतात. उदाहरणार्थ, बटाटा, आले, सुरण, इत्यादी. ही अन्नसंचय करणारी भूमिगत खोडे आहेत. कांदा हा खोड आणि पानांचा तळभाग मिळून बनलेला असतो. त्याचे खोड अगदी बुटके असते. त्याला कंद म्हणतात.

हवाई खोडे : ही खोडे जमिनीच्या पृष्ठभागाच्या बरीच वर आलेली असतात. ते करीत असलेल्या कार्यानुसार त्यांचे रूपांतर होते. उदाहरणार्थ, करवंद, डाळिंब, इत्यादी मध्ये टोकदार काट्यांमुळे संरक्षणाचे कार्य होते. आधारासाठी वेलींची खोडे दुसऱ्या झाडाचा आधार घेतात.

(3) पान

सामान्यतः खोडावर वाढणाऱ्या चपट्या, पातळ व हिरव्या अवयवास पान म्हणतात. पान हा वनस्पतीचा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. पानांमुळे झाडे हिरवी दिसतात. वातावरणातील साध्या घटकापासून अन्ननिर्मितीचे कार्य पानांत होते.

पानाची रचना पानामध्ये पर्णवृंत, पर्णपाते व उपपर्णे असे भाग दिसतात.

पर्णवृंत किंवा देठ (पिटीओल) : ज्या दांड्याने पान पर्णसंधीजवळ खोडाला जोडलेले असते त्याला देठ किंवा पर्णवृंत म्हणतात. पपई आणि एरंडीच्या पानांचे देठ लांब असतात तर करडई आणि पिवळा धोतरा यांना देठ नसतात. पानास देठ असल्यास सवंत व देठ नसल्यास अवृंत म्हणतात.

पर्णपाते (लॅमिना किंवा ब्लेड) पानाचे पाते म्हणजे हिरव्या रंगाचा पसरट भाग असतो त्याला पर्णपाते म्हणतात. पानावरील शिरांमुळे पान पसरट व ताठ राहते. अन्न तयार करणे व बाष्पोच्छ्वास ही पर्णपात्याची प्रमुख कार्ये आहेत. पर्णपात्याच्या आकारात मोठी विविधता दिसून येते. उसाचे पर्णपाते लांबलचक असते तर एरंडीचे पाते पंज्याच्या आकाराचे असते. पानाच्या मध्यावर मुख्य शीर व तिला अनेक उपशिरा असतात. यालाच शिराविन्यास (व्हेनेशन) म्हणतात. जालरूप व समांतर हे शिराविन्यासाचे दोन प्रकार आहेत. शिरांच्या रचनेत विविधता आढळते. उदाहरणार्थ, पिच्छक, एकप्रशिर, बहुप्रशिर,

-हस्ताकृती, अपसारी, अभिसारी, इत्यादी. पाणी व अन्न यांचे वहन या शिरांमधून होते. पानांच्या काठ व अग्रभागात विविधता आढळते. पानांची मांडणी झाडावर विविध प्रकारे होते. पानांचे आकार सूच्याकृती, रेषाकृती (गवत), भालाकृती, लांबट (केळी), अंडाकृती (वड), इत्यादी अनेक प्रकारचे असतात. पर्णकडांमध्येसुद्धा अखंड, कुठदंती, आरावत, दंतुर, संकटक असे अनेक प्रकार आढळतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *